दोन अक्षर दोन धडे



     ही गोष्ट त्यावेळची आहे, जेव्हा मी अगदीच लहान होते. जेमतेम सात-आठ वर्षाची असेन. तोवर नऊ वारी नेसायची वेळ आली नव्हती, परकर पोलक्यातचं असायचे. आमचं घर कोकणातलं. गुहागर तालुक्यात, निवळी गावात. छान आंबा, काजू, फणसाच्या गर्दीत मधोमध आमचं घर. मागच्या पडवीसमोर चार चिंचेची झाडं आणि एक माड. त्या माडाखाली उभं राहिलं की नाकासमोर निघणारी वाट थेट जंगलाकडे जाणारी. पुढे ही जंगलवाट आचऱ्यात आणि तळोठ्याला निघते.

मावशी त्या वाटेने अधीमधी आईला भेटायला यायची. कधी पहाटे-पहाटे कधी दुपारच्या वेळेस पण नेहमी गुपचूप. मागच्या दाराने यायची अन मागच्या दारानेच जायची. दोघींचा एकमेकीवर प्रचंड जिव्हाळा. मावशी आईपेक्षा दहा वर्षाने मोठी, कारण भावंडामध्ये आई सगळ्यात धाकटी. जन्मानंतरची दोन वर्ष आईने आजीच्या नाहीतर मावशीच्या कुशीत काढलेली. मग वयाच्या बाराव्या वर्षी मावशीच लग्न झालं आणि ती नवऱ्या घरी गेली. तेरा-चौदा वर्ष मावशीचा संसार अगदी सुखाचा झाला. पदरात तीन पिले रांगायला लागली आणि भावकीच्या जमीन-जुमल्याचा वादातून मारेकऱ्यांकरवी तिच्या नवऱ्याचा कोणीतरी काटा काढला. मावशी निराधार झाली. कर्मठ रूढीप्रमाणे विधवेचं जिनं तिच्या नशिबी आलेलं. पण तिने महर्षी कर्वे आणि पंडिता रमाबाई यांच्या कार्याबद्दल ऐकलं होतं. त्यामुळे तिने केशवपन आणि इतर रूढी सगळ्यांना विरोध केला आणि शिक्षण घेण्याचं ठरवलं. आमचा चुलत मामा थोडा पुरोगामी विचारांचा होता मावशीने त्याचं सहकार्य मिळवलं आणि हळूहळू शिक्षण घेवू लागली. परंतु यामुळे तिच्या नवऱ्याचा खुनाचा आळ गावाने तिच्यावरचं उठवला. तो आरोप तिचे तुकडे तुकडे करणारा होता. ती आकांताने पिळवटून रडायची. परंतु तिने शेवट पर्यंत जिद्द सोडली नाही. तिने शिक्षण घेतलं व ती शिक्षण प्रसाराला लागली. त्यामुळेच आमच्या घराशी तिला मज्जाव होता. तरी नाना घरी नसतील अशा वेळेस ती घरी येवून आईला व मला दोन अक्षर दोन धडे शिकवून जायची. मग माझं लग्न झालं आणि ती दोन अक्षरे दोन धडे गिरवणं बंद झालं. अकरा वर्षाच्या लहान वयात नऊ वारी नेसता-सांभाळताना नाकी नऊ यायचे. तो काळ आठवला की डोळ्याला आजही पदर लागतो आणि जग किती भव्य पालटलं याचा अंदाज येतो.

                      आमच्या रंगाची लेक, म्हणजे माझी नात आता चोवीस वर्षांची झालेय तरी अजून घरीचं आहे. शिकतेय काहीबाही. म्हणे जितकं शिकू तितके भरपूर पैसे कमावता येतील. तिच्यासमोर जास्त काही बोलण्याची सोय नाही मेली कार्टी खूप शिकलेय. इंग्रजीतून आमचा चांगला फडशा पाडते. बोट नाकासमोर नाचवून उत्तरं देते. अजिबात कशालाच घाबरत नाही. मेली रूमालाएवढे टीचभर कपडे घालून घरात राहते शिवाय तेवढ्याच कपड्यात बाहेर पण जाते. उघड्या मांड्या मुलांच्या मांड्याना बिनघोर चिकटवून बसते. आई-बापासमोर गळ्यात गळे काय घालते. गालांवर मुके काय देते. आणि दारू सिगरेट सुद्धा निर्धास्त सेवन करते.
जुन्या काळी टिळक आणि आगरकर या दोन मित्रांमध्ये स्त्री शिक्षणावरून मोठी भांडणं झालेली. आगरकर म्हणत होते “स्त्रियांची माथी अडाणी ठेवण्यात कसली आलेय धन्यता?” आणि टिळक म्हणत होते “स्त्रियांना विलायती शिक्षण द्याल तर घरच्या पोरी विलायतीचं होतील.” या दोघांमध्ये त्यावेळी नेमकं कोण बरोबर होतं हे त्याकाळीही लोकांना ठरवता आलं नाही आणि आजही येणार नाही.         

                                                                                                                                                                                                                                                  

Comments

  1. खुप छान 👌👌

    ReplyDelete
  2. Vry nice Satish..keep it up 👌

    ReplyDelete
  3. Ho satish khup ch sunder lihile ahes. Pan mazya mate agarkar barobr hote. Karan tyanche vidhan " striyanachi doki adani thevnyat kasli aliy dhanyata" ase ahe. Mhanjech strine sarv prakarchya goshti shikavya, asach tyancha hetu asel. Pn tilakanchya mate, " vilayati shikshan dile ki stri pn vilayti banel" pn ajchya generation madhil muli shikshan n ghetahi nustey observation nech sarv baabtit vilayati banat ch ahet.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गार्गी

कल्लोळ

मनोगाथा