Posts

Showing posts from October, 2017

आनंदमेळा

Image
आ मचं घर कधीच रिकामं राहत नाही. अगदी पहाटेपासून-रात्रीपर्यंत उंबऱ्याला पाय घासतच असतात लोकांचे. बागडणारी चिल्लर पार्टीसुद्धा आमच्या इथेच ठाण मांडून खेळते. घरात रोज मेळा भरलेला असतो ;  पण ‘आनंदमेळा.’ अगदी तशीच स्थिती आमच्या इमारती समोरल्या वटवृक्षाची. इतकी घरं सोडून आमच्याच घरी का माणसांची गर्दी होते, हे जसं मला कोडं? तसंच इतकी झाडं सोडून या झाडावरचं पक्षी-पाखरांची गर्दी कशी काय होते, हेही मला कोडं? आई मात्र कधी-कधी या सतत भरलेल्या घराला फार कंटाळते आणि आपला वैताग व्यक्त करू लागते. त्यावेळी मी दारासामोरला वटवृक्ष दाखवतो आणि म्हणतो, या झाडाला पक्ष्यांची श्रीमंती आहे आणि या घराला माणसांची. आई म्हणते, “ या श्रीमंतीचा काय उपयोग; हाल आम्ही काढतोय !’’ आणि हसून पुन्हा नव्या उत्साहाने सगळ्यांच्या सेवेस तत्पर होते. आठ दिवसांपूर्वी तो वटवृक्ष मुळासकट छाटण्यात आला. कारण काय? तर पार्किंगची जागा वाढावी. त्याक्षणी पक्ष्यांनी जमेल तितकं थैमान माजवलं. आर्त स्वराचा, दुःखाचा कल्लोळ केला ; पण त्यांचा पराभव झाला. ‘ ते बिथरलेले पक्षी आणि आडवं पडलेलं झाड ’ चित्र खूप विदारक होतं. मनाला विषण्ण

दोन अक्षर दोन धडे

Image
      ही गोष्ट त्यावेळची आहे, जेव्हा मी अगदीच लहान होते. जेमतेम सात-आठ वर्षाची असेन. तोवर नऊ वारी नेसायची वेळ आली नव्हती, परकर पोलक्यातचं असायचे. आमचं घर कोकणातलं. गुहागर तालुक्यात, निवळी गावात. छान आंबा, काजू, फणसाच्या गर्दीत मधोमध आमचं घर. मागच्या पडवीसमोर चार चिंचेची झाडं आणि एक माड. त्या माडाखाली उभं राहिलं की नाकासमोर निघणारी वाट थेट जंगलाकडे जाणारी. पुढे ही जंगलवाट आचऱ्यात आणि तळोठ्याला निघते. मावशी त्या वाटेने अधीमधी आईला भेटायला यायची. कधी पहाटे-पहाटे कधी दुपारच्या वेळेस पण नेहमी गुपचूप. मागच्या दाराने यायची अन मागच्या दारानेच जायची. दोघींचा एकमेकीवर प्रचंड जिव्हाळा. मावशी आईपेक्षा दहा वर्षाने मोठी, कारण भावंडामध्ये आई सगळ्यात धाकटी. जन्मानंतरची दोन वर्ष आईने आजीच्या नाहीतर मावशीच्या कुशीत काढलेली. मग वयाच्या बाराव्या वर्षी मावशीच लग्न झालं आणि ती नवऱ्या घरी गेली. तेरा-चौदा वर्ष मावशीचा संसार अगदी सुखाचा झाला. पदरात तीन पिले रांगायला लागली आणि भावकीच्या जमीन-जुमल्याचा वादातून मारेकऱ्यांकरवी तिच्या नवऱ्याचा कोणीतरी काटा काढला. मावशी निराधार झाली. कर्मठ रूढीप्रमाण