बाबांसोबत पाहिलेले गणपती

बाबांसोबत पाहिलेले गणपती


             मागले दोन दिवस पिच्छा पुरवल्या नंतर आज कार्ट्याने टोकाचाचं हट्ट धरला. “बाबा मला गणपती बघायला घेऊन चल.” आता काय सांगू याला...? रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मन इतकं थकून जात की कशाचाचं उत्साह राहत नाही. तसंही घराबाहेर पडून आवडीने साजरे करावेत असे सण राहिले नाहीत, का उत्सव राहिले नाहीत.
             पण बालपण म्हटलं की कुतूहल आलंच. लहानपणी मी सुद्धा माझ्या बाबांजवळ हट्ट धरला आणि अनेक गणपती पाहिले. त्यावेळचे गणेशोत्सव म्हणजे आनंद जल्लोष आजच्या इतकाचं, पण करमणूक आणि प्रबोधन त्याहून कित्येक पटीने जास्त. प्रत्येक छोट्या असो वा मोठ्या मंडपाबाहेर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. त्या रांगेत लहानांपासून थोरांपर्यंत आणि श्रीमंतापासून गरीबापर्यंत सर्वच. निरनिराळी लोकं. धर्म,जात,पंथ विसरून आलेली. मग त्या रांगेत ओळख-पाळख, संवाद होऊन छान ऋणानुबंध जुळायचे. आम्हा लहान मुलांची तर फारचं गट्टी जमायची. मग आम्ही त्या रांगेचे उंदीर. कुठूनही घुसायचं कुठेही शिरायचं. अख्ख्या रांगेला आमचा परिचय पडायचा. मंडपातून बाहेर निघणाऱ्या दारावर प्रसाद वाटणारा बसविला असल्यास त्याकडून वारंवार प्रसाद मिळवणे हे आमचं काम. इसम चांगला असल्यास प्रसाद सहज मिळायचा. नाहीतर थोडीशी मिन्नतवारी करावी लागायची. किंवा अखेरीस थोडीशी लबाडी. रांग जास्तचं मोठी असेल तर करमणुकीसाठी हास्यास्पद पथनाट्य असायचं किंवा एखादी नाटुकली. आम्ही लहान असल्यामुळे कधी-कधी विषय कळायचा नाही पण फार गंमत यायची. मग हळूहळू रांग सरकून आत पोहचायची. तिथे भव्य चलचित्रे साकारलेली असायची. मी अशी चलचित्रे खूप पाहिली. विष्णूचे दशावतार, कृष्णलीला, रामायण, महाभारत आणि अनेक पौराणिक कथा. याशिवाय साईंचे चमत्कार, ज्ञानोबा-तुकोबांच जीवन, टिळक-सावरकरांची देशभक्ती, गांधींची अहिंसा इत्यादी-इत्यादी खूप काही. कारगील युद्धाच्या देखाव्यांनी तर एकेकाळी डोळ्यात अश्रू आणलेले.
              आता विभागात चार-पाच गणपतींच दर्शन घेतलं. पण सगळीकडे भव्य आरास आणि भव्य गणेशमूर्ती. एके ठिकाणीही चलचित्र नाही. अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून आमच्या विभागातल्या सर्वात जुन्या रायगड चौक मंडळात आलो. या मंडळाने आजही आपली परंपरा सोडलेली नाही. अशी फारचं क़्वचित मंडळं आज मुंबईत आहेत ज्यांनी आपली चलचित्र देखाव्यांची परंपरा आजवर ठेवली आहे. या मंडळाने तर एक पाऊल पुढे टाकत जिवंत देखावा उभा केला आहे. आणि तो पाहण्यासाठी पूर्वीप्रमाणेच लोकांची चिक्कार गर्दी आहे. मी पण त्या रांगेद्वारे आत गेलो. शेवटचा कोपरा पकडला आणि माझे बाबा जसे मला खांद्यावर बसवायचे तसं माझ्या बेट्याला खांद्यावर बसवलं. आणि त्या अंधारातून आणखी एक अविस्मरणीय अनुभव घेऊन बाहेर पडलो.

              त्या देखाव्याने मला आणि माझ्या लेकाला मनोरंजन तर घडलं. पण रटाळ आयुष्याला लाथाडून थोडी जगण्याची उर्मी देखील आली. उद्याच्या समाज सुधारणेत कदाचित आमचा हनुमानाऐवढा वाटा नसेल पण खारूताईऐवढा नक्कीच असेल.      

Comments

  1. सही... अशा आठवणी महत्त्वाचा भाग आहेत आपल्या जीवनात

    ReplyDelete
  2. Khup chan lihile ahes satish☺ kharach aaj ganpati bastat tevha fakt lighting ani thermocoal chech decoration pahayla miltey. Purvi sarkhe sandesh denari activity aaj lok karat nahit. He aaj chintechich ek baab ahe. People should think on this topic vry seriously 😌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गार्गी

कल्लोळ

मनोगाथा