कल्पनेचा पाऊस



कल्पनेचा पाऊस





असं म्हणतात, साधारण गोष्टीला देखील आपल्या कल्पनेने, प्रतिभेने अलौकिक बनवतो, तो असतो कलाकार. या कलाकार मंडळीकडे एक वेगळी नजर आणि वेगळाच दृष्टीकोन असतो. कदाचित ही गोष्ट माझ्यात देखील आहे, असं मला वाटतं. कारण, अगदी लहानपणापासूनचं शाळेच्या खिडकीतून बाहेर दिसणारा पाऊस शाळेचं छत बाजूला करून आम्हावर पडावा किंवा त्याने नुसतंच शिक्षकांना भिजवावं, असं मला वाटायचं. काळ्या फळ्यावरील अक्षरे त्यावर पडलेल्या उन्हामुळे मलाचं सोनेरी दिसायची. खिडकीतून येणारं ऊन भिंतीच्या आधाराला दडून राहतंय आणि वारा मागोमाग त्याचा शोध घेण्यासाठी येतोय असं वाटायचं. बाकांच्या जागी आराम खुर्ची असावी, वह्या- पुस्तकांनी आपसूक बोलतं-लिहितं व्हावं, अशा भन्नाट कल्पनांनी डोकं भरलेलं असायचं.
         आत्ता पण आमच्या मुंबईतील उंची गगनचुंबी इमारत पाहताना, हीचा आधार घेऊन एखादा वेल वाढला तर? किंवा इमारतीच्या प्रत्येक गॅलरीतल्या कुंडीत वाढवलेल्या रोपट्यांनी एकत्र फुलं शिंपडली तर? अशा नाना कल्पना सुचतात. लोक उंच इमारत, प्रासाद पाहून बांधकामाचं कौतुक करतात. मी त्या इमारतीच्या कोनाड्यात केलेलं पक्षाचं घरटं शोधतो अथवा किनार धरून लोबंलेलं मधाचं पोवळ पाहतो. त्यातून ठिबकणारं मध कोण चाखत असेल याचा विचार करतो. माझी ही अशी तऱ्हा असल्यामुळे सुंदर, आकर्षक, झगझगीत, चकचकीत गोष्टी मला तात्पुरती रिझवतात; पण पूर्णता खुश करण्यात अपयशी ठरतात. सुंदर बंगले मी ढूंकूनही पाहत नाही; पण चार माडांच्या पहारेदारीत असलेलं कौलारू घर माझ्या मनाच्या तळाची खोली गाठतं. भव्य देवळातील सुंदर हारा-वस्त्राने सजवलेल्या देवाच्या मी पाया पडत नाही; पण शेंदूर लावून ठेवलेल्या ओबडधोबड दगडाला मी मनोभावे नमस्कार करतो. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी एका विशिष्ट चक्षुंनी पहिल्या जात असतात, मग त्यात सलग्न होतात भावना, जाग्या करतात संवेदना, भाग पाडतात विचार करायला आणि त्या विचारातून होते नवकल्पनेची उत्पत्ती. जी घडते कधी मूर्त रूपाने किंवा कायमची राहते बेमुर्त.
           यंदाच्या ग्रीष्माने चराचर पोळलं असताना रोज आभाळ भरून येतंय; पण तो साधा रिमझिमत सुद्धा नाही. काल राग अनावर झाला आणि हासडल्या शिव्या त्याला मनसोक्त. नंतर खुर्चीचा आधार घेऊन शांतपणे बसून राहिलो काहीवेळ. मग ढवळलं गेलं विचारांचं चक्र. त्यातून उभं राहिलं एक चित्र. ज्यामध्ये डोंगरावर घर करून राहणारी माणसं दगड झाली आणि त्या दगडापासून पुन्हा बलाढ्यपणे उभे राहिले तासलेले, पोखरलेले पर्वत आणि डोंगर. नदी-समुद्र किनाऱ्यावरच्या माणसांची वाळू झाली, जिने भरला गाळ जितका उपसलेला त्याच्या दुप्पट. इमारती रुपांतरीत झाल्या इतक्या डेरेदार वृक्षात ज्याची एकही फांदी छाटत्ता येणार नाही. धरतीतून उठला इतका दाह ज्याने भस्म केली सारी अशुद्धता आणि पसरली आपली हिरवी माया. पाणी, हवा, आकाश यांना स्वतःचे रंग आले, ज्यामुळे आभाळातून पडला धान्याचा पाऊस पोटाचं खपाट झालेल्या वाळक्या शरीरावर, शरण आलेल्या लाचारहीन माणसावर. त्याने मानले आभार त्या पावसाचे. मग पाऊस म्हणाला, मी निर्दयी कधीचं नव्हतो, खरे निर्दयी तुम्हीच होता.       

Comments

  1. Ho ajchi paristhiti pahili tr pratyek manushyala aplyala hava asanara paus kalpanetach pahata yeil. Anyatha chaar mahinyanchya pavsalyat fakt 2 themb paus ch anubhavata yeil.🙂 vry beautifully explained satish.👍

    ReplyDelete
  2. उत्तम मांडणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गार्गी

कल्लोळ

मनोगाथा