तेच ते तेच ते


तेच ते तेच ते


अस्सल माणसांच्या जगात वावरताना जगाला आलेला भंपकपणा कळतो. विद्यापीठं माणसं घडवतात का? पण माणसांनी विद्यापीठं घडवली. अंतर्बाह्य मनुष्य अभ्यासाचा एखादा कोर्स का नाही? प्रत्येक नोकरी धंद्याला उपयोगी पडणारा आहे हा कोर्स.
प्रत्येक माणसाचा प्रवास एक वेगळ्याच तत्वावर चाललेला असतो. कारण त्याचं परीघ निराळं म्हणून त्याची गणितं पण निराळी. समाधानाची जागा तर त्याहून. म्हणूनच या गोलाकार जगात उभ्या, आडव्या, सरळ, तिरप्या, वर्तुळ अशा सगळ्या पद्धतीने चालणारी माणसं आढळतात. त्यामुळेचं समुहात सुद्धा प्रत्येक चेहरा निराळा राहतो.
पक्षाची विचारसरणी मूर्ख. तरी पक्षासोबत राहून जनहिताची कामे घडवून आणणारा धाडसी. तो प्रचंड आशावादी असतो म्हणून त्याला वैफल्य नाही. आपल्यासारखे अनेक असतील फक्त गाठ पडण्याचा अवकाश आहे यावर त्याची श्रद्धा. कोणी नसलं तरी भगवंत नक्कीच असेल, या विश्वासावर त्याचा सगळा आशावाद.
दुसरीकडे, हे मूर्ख जण कधीचं शहाणे होणार नाही या विश्वासावर ठाम. जग विनाशाकडे निघालय आणि विनाशकाले विपरीत बुद्धी हीच गोष्ट अगदी योग्य अशी त्याची समजूत. अथक परिश्रम केवळ तुम्हाला थकवा आणतात आणि जगाला शिव्या देण्याचा अधिकार मिळवून देतात यापलीकडे काही नाही. समाजसेवेचा वसा घेणारे केवळ थुंकी साफ करत राहतात, समाजाचा विडा वेगळ्याच रंगाने रंगत जातो. तुम्ही किती क्षुद्र आहात याची जाणीव समाज तुमच्याकडे सहज दुर्लक्ष करून तुम्हाला करून देतो. अशा प्रसंगी विषाचा पेला सुद्धा अमृत लागेल इतका गोड होतो; पण तोही ओठी लावण्याचं बळ निघून गेलेलं असतं. शेवट एक खुमखुमी राहते, या समाजाचा विनाश पाहण्याची. पण तोही झपाट्याने होत नाही. मग उरते मरेपर्यंतची चरफड.
तिसरीकडे प्रवाहासोबत पोहण्याचा सुटसुटीत मार्ग. जग उद्धारास गेले तरी तिकडे, विलयास निघाले तरी तिकडे. स्वतचे शब्द नाहीत, विचार नाहीत, आयुष्य गेलं म्हणजे झालं. खोट्या कारणमीमांसा मनाची समजूत घालतात. एकदश इंद्रीये लब्धप्रतिष्ठेला वाहिलेली. म्हणून मनात आठवणींना जागा असली तरी संगोपनाला नाही. सामर्थ्य हरवलेले नाही; पण आहे याची जाणही नाही.
चौथीकडे गर्व, अभिमान आहे. आपण जगनिराळे असण्याचा. त्यामुळे सोबत असलेल्यांना सलाम, नसलेल्यांना रामराम. वेड्याची उपमा आवडीची म्हणून वेडेपणाला आणखी बहर. चिरकाल आनंद मिळवल्याचा समज. जयजयकार करा अथवा धिक्कार आम्ही आमचे निरपेक्ष कार्यवाहक.

अशा सहस्त्र लाखो मनुष्य तऱ्हा. त्या समजल्या तर नवे वेद लिहिता येतील. अनेक ग्रंथ तयार होतील. मग त्या ग्रंथासाठी पुन्हा विद्यापीठं. आणि त्या विद्यापीठात पुढे ..........

Comments

  1. Waah satish exactly points mentioned kele ahes. Khup vicharpurvak lihile ahes. Ani tu shabda tr etke sunder vaprle ahes ki ata mazyakdech kahi shabda urle naiyet tula sangayla. Bdw keep it up🙂👌🖒

    ReplyDelete
  2. अप्रतिम विचार 👌

    ReplyDelete
  3. Khup chan ahe ! Really appreciable!👌👌👌

    ReplyDelete
  4. vidyapeetha manas ghadvatat and manas parat vidyapith .. sounds like nuclear fission. well written.

    ReplyDelete
  5. वाह.....मस्त लिहिलंयस सतीश

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गार्गी

कल्लोळ

मनोगाथा