Posts

मनोगाथा

Image
मनोगाथा गिरणीत घालायला सांगितलेलं दळण तीन दिवस जागच्या जागी पडून होतं. आईने चिक्कार बोलणी ऐकवली. दळणाची पिशवी उचलली आणि चालू लागलो. आईचे शब्द कानात जसेच्या तसे घुमत होते. “कशात म्हणजे कशात काडीचं लक्ष नाही. देव जाणे कुठच्या धुंदीत असतात? यांच्यापेक्षा बेवडे तरी बरे...! पुढे जाऊन काय होणार आहे या कार्ट्याच काय माहित..?” आईचं सगळं बोलणं अगदी बरोबर होतं. सध्या चित्त स्थिर नाही. मनात वेगवेगळे निव्वळ तरंग नाही, तर  विचारांच्या विशाल लाटा उठतात. प्रश्नांचे तर इतके मोठे मनोरे उभे राहतात की त्यासमोर मी पुरता ढळून जातो. एक भयंकर पोकळी तयार झालेय आतमध्ये. जी कोणत्याही सुखाच्या क्षणाने भरली जात नाहीए. उलट दिवसेंदिवस मळभ पसरत चाललेय. उदासीनता गडद होत चाललेय. इतकी घनघोर की काही केल्या मन उभारी घेतचं नाही. मी थोरामोठ्यांची चरित्रे वाचतोय, तत्त्वज्ञान समजून घेतोय, इतिहासाची पानं मोडतोय, विज्ञान- तंत्रज्ञान अनेक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतोय. स ध्याची परिस्थिती मला सर्वकाल, सर्वयुंगापेक्षा महाभयंकर वाटतेय. सगळं वाटोळं होतंय. आणि ज्या गतिने होतंय ती गती अनाकलनीय आहे. जगाला मिनिटा-मि...

आली ही थंडी गुलाबी

Image
आली ही थंडी गुलाबी आज अचानक सकाळी मला लवकर जाग आली. जशी कधी तरी येते तशी. ऐरवी मी तीन-चार तास उशीरा उठतो. अलार्म वैगरे लावून मला झोपण्याची सवय नाही; त्यामुळे उठण्याचीही नाही. पूर्ण झोप काढून उठायचं. कुंभकर्णाने केली ती चूक आपण करायची नाही. अर्ध्या झोपेतून गेलेला म्हणून मारला गेला. पण त्याचं मरू दे! आज सकाळी मी लवकर उठलो. बायको रोजच्यासारखीच घट्ट बिलगून झोपलेली. पण इतर कुठच्या गोष्टीचा मूड झाला नाही म्हणून घराबाहेर पडलो. हिंडायला. अजून सगळीकडे अंधारच होता. कदाचित सूर्य त्याच्या बेडरूममध्ये असावा. चांदण्या आकाशात छान लुकलुकत होत्या. बहुतेक त्यांना सूर्याची गंमत माहित असावी किंवा ‘सूर्याला आज उशीरचं होणार’ हे त्यांच्या ध्यानी आलेलं असावं. पण खरोखर उशीर झाला असेल तर सूर्याने त्याचं टेन्शन घेवू नये. चांगले थंडीचे दिवस आहेत, साला आता मजा नाय करायची तर केव्हा करायची? चांदण्या म्हणतील पावसाळ्यात पण मजा करतोच की! तरी त्याला हक्क आहे. त्याची बायको मार्च मध्ये माहेरी जाते ती डायरेक्ट जूनमध्ये येते. इतके दिवस हा जी कळ काढतो ती काय थोडी? एकतर याच्या अंगात केवढी आग! असो! बाहेर पडल्यापासून ...

आनंदमेळा

Image
आ मचं घर कधीच रिकामं राहत नाही. अगदी पहाटेपासून-रात्रीपर्यंत उंबऱ्याला पाय घासतच असतात लोकांचे. बागडणारी चिल्लर पार्टीसुद्धा आमच्या इथेच ठाण मांडून खेळते. घरात रोज मेळा भरलेला असतो ;  पण ‘आनंदमेळा.’ अगदी तशीच स्थिती आमच्या इमारती समोरल्या वटवृक्षाची. इतकी घरं सोडून आमच्याच घरी का माणसांची गर्दी होते, हे जसं मला कोडं? तसंच इतकी झाडं सोडून या झाडावरचं पक्षी-पाखरांची गर्दी कशी काय होते, हेही मला कोडं? आई मात्र कधी-कधी या सतत भरलेल्या घराला फार कंटाळते आणि आपला वैताग व्यक्त करू लागते. त्यावेळी मी दारासामोरला वटवृक्ष दाखवतो आणि म्हणतो, या झाडाला पक्ष्यांची श्रीमंती आहे आणि या घराला माणसांची. आई म्हणते, “ या श्रीमंतीचा काय उपयोग; हाल आम्ही काढतोय !’’ आणि हसून पुन्हा नव्या उत्साहाने सगळ्यांच्या सेवेस तत्पर होते. आठ दिवसांपूर्वी तो वटवृक्ष मुळासकट छाटण्यात आला. कारण काय? तर पार्किंगची जागा वाढावी. त्याक्षणी पक्ष्यांनी जमेल तितकं थैमान माजवलं. आर्त स्वराचा, दुःखाचा कल्लोळ केला ; पण त्यांचा पराभव झाला. ‘ ते बिथरलेले पक्षी आणि आडवं पडलेलं झाड ’ चित्र खूप विदारक होतं. मनाला विष...

दोन अक्षर दोन धडे

Image
      ही गोष्ट त्यावेळची आहे, जेव्हा मी अगदीच लहान होते. जेमतेम सात-आठ वर्षाची असेन. तोवर नऊ वारी नेसायची वेळ आली नव्हती, परकर पोलक्यातचं असायचे. आमचं घर कोकणातलं. गुहागर तालुक्यात, निवळी गावात. छान आंबा, काजू, फणसाच्या गर्दीत मधोमध आमचं घर. मागच्या पडवीसमोर चार चिंचेची झाडं आणि एक माड. त्या माडाखाली उभं राहिलं की नाकासमोर निघणारी वाट थेट जंगलाकडे जाणारी. पुढे ही जंगलवाट आचऱ्यात आणि तळोठ्याला निघते. मावशी त्या वाटेने अधीमधी आईला भेटायला यायची. कधी पहाटे-पहाटे कधी दुपारच्या वेळेस पण नेहमी गुपचूप. मागच्या दाराने यायची अन मागच्या दारानेच जायची. दोघींचा एकमेकीवर प्रचंड जिव्हाळा. मावशी आईपेक्षा दहा वर्षाने मोठी, कारण भावंडामध्ये आई सगळ्यात धाकटी. जन्मानंतरची दोन वर्ष आईने आजीच्या नाहीतर मावशीच्या कुशीत काढलेली. मग वयाच्या बाराव्या वर्षी मावशीच लग्न झालं आणि ती नवऱ्या घरी गेली. तेरा-चौदा वर्ष मावशीचा संसार अगदी सुखाचा झाला. पदरात तीन पिले रांगायला लागली आणि भावकीच्या जमीन-जुमल्याचा वादातून मारेकऱ्यांकरवी तिच्या नवऱ्याचा कोणीतरी काटा काढला. मावशी निराधार झाली. कर...

कल्लोळ

Image
 ( रात्रीची वेळ. एक तरुण मुलगा बाहेरून घरात येतो. हातातील ओली छत्री न उघडता तशीच फेकून देतो आणि एका खुर्चीत रेलून बसतो. [तो थोडा भिजलेला आहे.] मग ओघळणारे थेंब हातानेच पुसतो आणि झटक्यात उठून काहीतरी शोधू लागतो. एक डायरी त्याच्या हाताला लागते, तिची पानं चाळतो आणि कुठून तरी पेन हुडकून लिहू लागतो. ) यंदाच्या वर्षातही ग्रेड घसरणार. गेल्या वर्षी निदान B तरी मिळाला होता. टी.वाय. तर बाहेरून दिलेलंच बरं. साला हे आयुष्यात मित्र घुसलेत की दुश्मन. नासाडी होतेय सगळी. आजचीच गोष्ट घ्या. बाहेर छान पाऊस पडत होता. अभ्यासात मन लागतच नाही हल्ली, म्हणून म्हटलं ज्ञानेश्वरीतला एखादा अध्याय वाचून त्यावर चिंतन-मनन करू. तेवढच मौलिक काहीतरी. तितक्यात आला धन्या. चल बाहेर जाऊया. मी नाय येणार. पोरीसारखी नाटकं करू नको. नाटकं कसली? मला खरोखर नाय यायचं तुझ्याबरोबर. पिंकू असती नं तुला मस्का लावला नसता. भेंंच्योत बाप तिचा जबरदस्ती घेऊन गेला गावी. मरू दे, जावू दे. तू चल. पण कुठे जायचंय? पंचायती सोड आणि चल. बाहेर इतका मस्त पाऊस पडतोय अन् पोथ्या कसल्या वाचत बसलाय. शेवट ज्ञानेश्वरी राहिली. या चां...

बाबांसोबत पाहिलेले गणपती

Image
बाबांसोबत पाहिलेले गणपती              मागले दोन दिवस पिच्छा पुरवल्या नंतर आज कार्ट्याने टोकाचाचं हट्ट धरला. “बाबा मला गणपती बघायला घेऊन चल.” आता काय सांगू याला...? रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मन इतकं थकून जात की कशाचाचं उत्साह राहत नाही. तसंही घराबाहेर पडून आवडीने साजरे करावेत असे सण राहिले नाहीत, का उत्सव राहिले नाहीत.              पण बालपण म्हटलं की कुतूहल आलंच. लहानपणी मी सुद्धा माझ्या बाबांजवळ हट्ट धरला आणि अनेक गणपती पाहिले. त्यावेळचे गणेशोत्सव म्हणजे आनंद जल्लोष आजच्या इतकाचं, पण करमणूक आणि प्रबोधन त्याहून कित्येक पटीने जास्त. प्रत्येक छोट्या असो वा मोठ्या मंडपाबाहेर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. त्या रांगेत लहानांपासून थोरांपर्यंत आणि श्रीमंतापासून गरीबापर्यंत सर्वच. निरनिराळी लोकं. धर्म,जात,पंथ विसरून आलेली. मग त्या रांगेत ओळख-पाळख, संवाद होऊन छान ऋणानुबंध जुळायचे. आम्हा लहान मुलांची तर फारचं गट्टी जमायची. मग आम्ही त्या रांगेचे उंदीर. कुठूनही घुस...

कल्पनेचा पाऊस

Image
कल्पनेचा  पाऊस असं म्हणतात, साधारण गोष्टीला देखील आपल्या कल्पनेने, प्रतिभेने अलौकिक बनवतो, तो असतो कलाकार. या कलाकार मंडळीकडे एक वेगळी नजर आणि वेगळाच दृष्टीकोन असतो. कदाचित ही गोष्ट माझ्यात देखील आहे, असं मला वाटतं. कारण, अगदी लहानपणापासूनचं शाळेच्या खिडकीतून बाहेर दिसणारा पाऊस शाळेचं छत बाजूला करून आम्हावर पडावा किंवा त्याने नुसतंच शिक्षकांना भिजवावं, असं मला वाटायचं. काळ्या फळ्यावरील अक्षरे त्यावर पडलेल्या उन्हामुळे मलाचं सोनेरी दिसायची. खिडकीतून येणारं ऊन भिंतीच्या आधाराला दडून राहतंय आणि वारा मागोमाग त्याचा शोध घेण्यासाठी येतोय असं वाटायचं. बाकांच्या जागी आराम खुर्ची असावी, वह्या- पुस्तकांनी आपसूक बोलतं-लिहितं व्हावं, अशा भन्नाट कल्पनांनी डोकं भरलेलं असायचं.          आत्ता पण  आमच्या मुंबईतील उंची गगनचुंबी इमारत पाहताना, हीचा आधार घेऊन एखादा वेल वाढला तर? किंवा इमारतीच्या प्रत्येक गॅलरीतल्या कुंडीत वाढवलेल्या रोपट्यांनी एकत्र फुलं शिंपडली तर? अशा नाना कल्पना सुचतात. लोक उंच इमारत, प्रासाद पाहून बांधकामाचं कौतुक करतात. मी त्...