मनोगाथा


मनोगाथा
गिरणीत घालायला सांगितलेलं दळण तीन दिवस जागच्या जागी पडून होतं. आईने चिक्कार बोलणी ऐकवली. दळणाची पिशवी उचलली आणि चालू लागलो. आईचे शब्द कानात जसेच्या तसे घुमत होते. “कशात म्हणजे कशात काडीचं लक्ष नाही. देव जाणे कुठच्या धुंदीत असतात? यांच्यापेक्षा बेवडे तरी बरे...! पुढे जाऊन काय होणार आहे या कार्ट्याच काय माहित..?”
आईचं सगळं बोलणं अगदी बरोबर होतं. सध्या चित्त स्थिर नाही. मनात वेगवेगळे निव्वळ तरंग नाही, तर  विचारांच्या विशाल लाटा उठतात. प्रश्नांचे तर इतके मोठे मनोरे उभे राहतात की त्यासमोर मी पुरता ढळून जातो. एक भयंकर पोकळी तयार झालेय आतमध्ये. जी कोणत्याही सुखाच्या क्षणाने भरली जात नाहीए. उलट दिवसेंदिवस मळभ पसरत चाललेय. उदासीनता गडद होत चाललेय. इतकी घनघोर की काही केल्या मन उभारी घेतचं नाही.
मी थोरामोठ्यांची चरित्रे वाचतोय, तत्त्वज्ञान समजून घेतोय, इतिहासाची पानं मोडतोय, विज्ञान- तंत्रज्ञान अनेक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतोय.
ध्याची परिस्थिती मला सर्वकाल, सर्वयुंगापेक्षा महाभयंकर वाटतेय. सगळं वाटोळं होतंय. आणि ज्या गतिने होतंय ती गती अनाकलनीय आहे. जगाला मिनिटा-मिनिटात स्थित्यंतरे येत आहेत. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, तांत्रिक, इ.इ. कोणत्याही स्वरूपाची. आणि प्रत्येक स्थित्यंतरासोबत घडतेय ती केवळ हानी. या जगाला पुढे काही तारणार असेल असं मला वाटत नाही. कारण मुळात वैचारिक पातळीवरची घसरण इतकी प्रचंड आहे, की जगाला सावरणारा विचार येथे रुजणंचं अशक्य झालंय.
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत,
अम्युथानाम् अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनाम विनाशायच: दुष्कृताम,
धर्म संस्थापनाथार्य सम्भावामी युगे युगे ||
हे म्हणणाऱ्या भगवंतालाही पुढे या जगाला सावरता येईल, यावर मला दाट शंका आहे. जगाने असं परिवर्तन घेतलय की ‘पैसा आणि सत्ता’ याउपर देव राहिला नाही. धन कमावण्यासाठीचं काय तो माणसाचा जन्म. ते ज्याला मिळविता येत नसेल तो मूर्ख. आणि ज्याला मिळविता येत असेल तो श्रेष्ठ. नैतिक-अनैतिक, धर्म-अधर्म, पाप-पुण्य ही पारडी केव्हाचीचं गळून पडली. ठाम विचार एकचं “पैसा आणि गरजा.” केवळ पैसाचं गरजा संपवू शकतो अन्य कोणता उपाय नाही. त्यामुळेचं परस्पर सहकार्य आणि स्वयंपूर्णता या तत्त्वांवर चालणारी गावं मोडून पडली. त्यांची नगरं झाली. नगरांची महानगरं झाली. माणसं या व्यवस्थेला इतकी चाळवली की स्वताचा स्वाभिमान, इमान, अभिमान, ज्ञान, गुण, कला, भाषा, संस्कृती, जीवनशैली सगळ्याचं गोष्टी गुडघे मोडून तिच्यासमोर शरण गेल्यात. पराकोटीचा दास कोणी झाला असेल; तर तो आहे निसर्ग.
आज विकसित देशानांही माणसांची पैदास थांबवता येत नाही. कारण पैसा आणि सत्तेच्या बरोबरीने थैमान घालतेय वासना. जिचा विळखा बुद्धी भ्रष्ट करून टाकतो. नाती-गोती, वयोमर्यादा, पत-प्रतिष्ठा, नीतीमत्ता, लाजभीड, शिक्षा-संस्कार सोडून माणूस अमानुष होतो.
कामग्रस्ते महाहानी
कामाने ग्रासलेल्या माणसाला, समाजाला एक न एक दिवस महाहानीला समोरं जावचं लागणार.
त्यात हे यांत्रिक युग. त्यामुळे यंत्रासारखी माणसं. भावना, संवेदना शून्य किंवा दोहोंचा अतिरेक.
तंत्रज्ञानाची उन्नती म्हणजे भस्मासुराला मिळालेल्या वरदानासारखी. विकास-प्रगतीच्या भ्रमाच्या भोपळ्यात बसून माणसं नेमकी कुठे निघाली आहेत देव जाणे?
हे सगळं इतकं हाताबाहेर गेलं आहे की निरुपाय झालं आहे. हे कसं सुधारता येईल? समाजाची प्रवृत्ती बदलणे सोप काम नव्हे! काही लोक जरूर समर्थन करतील; पण बरेचसे फडशा पडण्यास तयार होतील. असंतोषाची आंदोलन मिनिटा-मिनिटाला उभी राहतात आणि सेकंदात चिरडून टाकली जातात. लढणाऱ्याला समाधानाच्या ऐवजी पश्चाताप करावा लागतोय. टेबलाखालून चालणारी घटना, संघटना मुळात डोकं वर काढूच देत नाही कुणाला.! ठेचूनच टाकते!
त्यात कधी-कधी सामाजिक जबाबदाऱ्यांपेक्षा कौटुंबिक जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या होतात की घरच्यांनी सांगितलेलं चाकोरीबद्ध जीवन अगदी योग्य वाटतं. “शिका-सवरा, नोकरी धरा, लग्न करा आणि मार्गी लागा.” मूल्य, तत्त्व यावर जगण्याचा जमाना गेला आता. पावलोपावलीची तडजोड तत्त्वाच रूप-स्वरूप बदलायला भागचं पाडत असेल, तर ती तत्त्व न जोपासलेलीचं बरी.

“चालता चालता बराच पुढे निघून आलोय. गिरण मागेच राहिली.”       


Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. ह्याच लाटांमध्ये पार बुडालेलो आहे. छान लिहीलय. ��

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गार्गी

कल्लोळ