गार्गी



    मला माझे डोळे फोडून घ्यावेसे वाटतात; आज तुझ्या डोळ्यांत पाहताना. किती किळसवाणा दिसतो मी त्यात? नालायक, बेजबाबदार, अकर्तबगार, अयशस्वी आणि संपूर्णतः पराजित. गबाळा अवतार केला मी स्वतःचा आणि तूझासुद्धा. म्हणूनच तुझ्या डोळ्यांतील माया, प्रेम जसेच्या तसे असले तरी विश्वास आटला. अश्रूंनी तो आटवला. त्यात किंचितशी देखील उमेद राहिली नाही. पण प्रश्न हा आहे, तूला मी इतका अनोळखी झालोच कसा? माझी स्वप्न अशी मातीमोल का वाटू लागली तूला? माझा प्रामाणिकपणा निरर्थक कसा काय झाला? माझी मेहनत जी तुझ्या दृष्टीसमोर होती ती दृष्टीआड कशी गेली? माझा संघर्ष आज वेडेपणाचा का वाटतो तूला?    
     तू म्हणायचीस “तू बाळ आहेस माझं.” छातीशी धरून कित्येकदा पाजलससुद्धा. मी पण माझे हात इवलेसे करून तुझ्या छातीवरून फिरवायचो, तुझ्या पोटाला मिठी घालून शांत झोपून जायचो, तूलासुद्धा निवांत झोप यायची. माझे ओठ तूला तान्ह्या बाळाचे वाटायचे. ज्याला दुधाचा गंध नसला तरी तूला आवडणारा सिगरेटचा दर्प असायचा. त्या ओठांचे तू किती मुके घेतले तूला आठवतंय..! माझ्या अंगाचा घाम अभिमान होता तूझा. तू म्हणायचीस, "या घामाचं मोल परमेश्वराला कळल की लोकांना जरूर कळेल." आणि त्या अभिमानामुळेच तुझ्या योनीतला रस माझ्या लिंगावर मनापासून सांडलास. दहावर्षे. 
     दहावर्षे झाली आपल्या लग्नाला. या एवढ्या वर्षात सगळे प्रसंग आपण एकत्रित सोसले. मी मान्य करतो तू दमली असशील. नाही दमलीच आहेस. पण अशी वाट वाकडी करू नकोस. तू सामर्थ्य आहेस माझं. आठवणींच गाठोडं खूप मोठं आहे गार्गी. ते कसं विस्मरणात नेणार तू? आणि कसं नेऊ मी? आपल्या दोघात तिसरं येईल ते आपलं फक्त बाळ. हे जग कसं काय मधे आलं? माझी निर्धनता, माझी गरिबी लाज कशी काय ठरू लागली तूला?
     या जगाने छान कावा केलाय. माझी सत्यता, नितीमत्ता, सचोटी यांच्या निंदेने मोडली नाही तर तुझे कान फुंकून माझ्यासमोर उभं केलं. त्यांनी अचूक ओळखलं की जे त्यांच्या लाखोळ्यांनी शक्य होणार नाही ते तुझ्या एका शब्दाने होईल; पण गार्गी हे जनावरासारखे जगतात म्हणून मी नाही जगू शकत. मला देवाने बुद्धी, वाचा, हात, पाय, इंद्रिये दिली आहेत मग कर्तव्यविमुख, संवेदनाहीन कसा होऊ? पैश्याच्या राशी मी नाही माजवू शकत; कारण निधन होऊन या जगातून जायचं असतं हे आज जगाला कळत नसेल, तरी मला कळतं! तुझी मी आबाळ केली हे जरी सत्य तरी कर्तव्याशी बिमोड झालेला नाही. 
     गार्गी आम्ही कलेला जीवंत ठेवणारे कलावंत आणि तुम्ही आम्हाला जीवंत ठेवणाऱ्या संजीवनी. आम्हा प्रायोगिक नाटकवाल्यांची दुर्दशा ही होणारच. कारण आमची दुर्दशा झाल्याशिवाय समाजाची दशा बदलणार नाही. त्यामुळे तुझ्या ऋणांची परतफेड कोणत्याच जन्मात शक्य नाही. तूझ्या अस्तित्वावर माझी मालकी आहे; तूच ती स्वाधीन केलीस, ती पुन्हा मागू नकोस. कारण मी जगासमोर हरायला तयार आहे; पण तूझ्यासमोर नाही. 





                               
     

Comments

Popular posts from this blog

कल्लोळ

मनोगाथा