गार्गी

मला माझे डोळे फोडून घ्यावेसे वाटतात; आज तुझ्या डोळ्यांत पाहताना. किती किळसवाणा दिसतो मी त्यात? नालायक, बेजबाबदार, अकर्तबगार, अयशस्वी आणि संपूर्णतः पराजित. गबाळा अवतार केला मी स्वतःचा आणि तूझासुद्धा. म्हणूनच तुझ्या डोळ्यांतील माया, प्रेम जसेच्या तसे असले तरी विश्वास आटला. अश्रूंनी तो आटवला. त्यात किंचितशी देखील उमेद राहिली नाही. पण प्रश्न हा आहे, तूला मी इतका अनोळखी झालोच कसा? माझी स्वप्न अशी मातीमोल का वाटू लागली तूला? माझा प्रामाणिकपणा निरर्थक कसा काय झाला? माझी मेहनत जी तुझ्या दृष्टीसमोर होती ती दृष्टीआड कशी गेली? माझा संघर्ष आज वेडेपणाचा का वाटतो तूला? तू म्हणायचीस “तू बाळ आहेस माझं.” छातीशी धरून कित्येकदा पाजलससुद्धा. मी पण माझे हात इवलेसे करून तुझ्या छातीवरून फिरवायचो, तुझ्या पोटाला मिठी घालून शांत झोपून जायचो, तूलासुद्धा निवांत झोप यायची. माझे ओठ तूला तान्ह्या बाळाचे वाटायचे. ज्याला दुधाचा गंध नसला तरी तूला आवडणारा सिगरेटचा दर्प असायचा. त्या ओठांचे तू किती मुके घेतले तूला आठवतंय..! माझ्या अंगाच...