मनोगाथा

मनोगाथा गिरणीत घालायला सांगितलेलं दळण तीन दिवस जागच्या जागी पडून होतं. आईने चिक्कार बोलणी ऐकवली. दळणाची पिशवी उचलली आणि चालू लागलो. आईचे शब्द कानात जसेच्या तसे घुमत होते. “कशात म्हणजे कशात काडीचं लक्ष नाही. देव जाणे कुठच्या धुंदीत असतात? यांच्यापेक्षा बेवडे तरी बरे...! पुढे जाऊन काय होणार आहे या कार्ट्याच काय माहित..?” आईचं सगळं बोलणं अगदी बरोबर होतं. सध्या चित्त स्थिर नाही. मनात वेगवेगळे निव्वळ तरंग नाही, तर विचारांच्या विशाल लाटा उठतात. प्रश्नांचे तर इतके मोठे मनोरे उभे राहतात की त्यासमोर मी पुरता ढळून जातो. एक भयंकर पोकळी तयार झालेय आतमध्ये. जी कोणत्याही सुखाच्या क्षणाने भरली जात नाहीए. उलट दिवसेंदिवस मळभ पसरत चाललेय. उदासीनता गडद होत चाललेय. इतकी घनघोर की काही केल्या मन उभारी घेतचं नाही. मी थोरामोठ्यांची चरित्रे वाचतोय, तत्त्वज्ञान समजून घेतोय, इतिहासाची पानं मोडतोय, विज्ञान- तंत्रज्ञान अनेक वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतोय. स ध्याची परिस्थिती मला सर्वकाल, सर्वयुंगापेक्षा महाभयंकर वाटतेय. सगळं वाटोळं होतंय. आणि ज्या गतिने होतंय ती गती अनाकलनीय आहे. जगाला मिनिटा-मि...