आनंदमेळा

आ मचं घर कधीच रिकामं राहत नाही. अगदी पहाटेपासून-रात्रीपर्यंत उंबऱ्याला पाय घासतच असतात लोकांचे. बागडणारी चिल्लर पार्टीसुद्धा आमच्या इथेच ठाण मांडून खेळते. घरात रोज मेळा भरलेला असतो ; पण ‘आनंदमेळा.’ अगदी तशीच स्थिती आमच्या इमारती समोरल्या वटवृक्षाची. इतकी घरं सोडून आमच्याच घरी का माणसांची गर्दी होते, हे जसं मला कोडं? तसंच इतकी झाडं सोडून या झाडावरचं पक्षी-पाखरांची गर्दी कशी काय होते, हेही मला कोडं? आई मात्र कधी-कधी या सतत भरलेल्या घराला फार कंटाळते आणि आपला वैताग व्यक्त करू लागते. त्यावेळी मी दारासामोरला वटवृक्ष दाखवतो आणि म्हणतो, या झाडाला पक्ष्यांची श्रीमंती आहे आणि या घराला माणसांची. आई म्हणते, “ या श्रीमंतीचा काय उपयोग; हाल आम्ही काढतोय !’’ आणि हसून पुन्हा नव्या उत्साहाने सगळ्यांच्या सेवेस तत्पर होते. आठ दिवसांपूर्वी तो वटवृक्ष मुळासकट छाटण्यात आला. कारण काय? तर पार्किंगची जागा वाढावी. त्याक्षणी पक्ष्यांनी जमेल तितकं थैमान माजवलं. आर्त स्वराचा, दुःखाचा कल्लोळ केला ; पण त्यांचा पराभव झाला. ‘ ते बिथरलेले पक्षी आणि आडवं पडलेलं झाड ’ चित्र खूप विदारक होतं. मनाला विष...