कल्पनेचा पाऊस

कल्पनेचा पाऊस असं म्हणतात, साधारण गोष्टीला देखील आपल्या कल्पनेने, प्रतिभेने अलौकिक बनवतो, तो असतो कलाकार. या कलाकार मंडळीकडे एक वेगळी नजर आणि वेगळाच दृष्टीकोन असतो. कदाचित ही गोष्ट माझ्यात देखील आहे, असं मला वाटतं. कारण, अगदी लहानपणापासूनचं शाळेच्या खिडकीतून बाहेर दिसणारा पाऊस शाळेचं छत बाजूला करून आम्हावर पडावा किंवा त्याने नुसतंच शिक्षकांना भिजवावं, असं मला वाटायचं. काळ्या फळ्यावरील अक्षरे त्यावर पडलेल्या उन्हामुळे मलाचं सोनेरी दिसायची. खिडकीतून येणारं ऊन भिंतीच्या आधाराला दडून राहतंय आणि वारा मागोमाग त्याचा शोध घेण्यासाठी येतोय असं वाटायचं. बाकांच्या जागी आराम खुर्ची असावी, वह्या- पुस्तकांनी आपसूक बोलतं-लिहितं व्हावं, अशा भन्नाट कल्पनांनी डोकं भरलेलं असायचं. आत्ता पण आमच्या मुंबईतील उंची गगनचुंबी इमारत पाहताना, हीचा आधार घेऊन एखादा वेल वाढला तर? किंवा इमारतीच्या प्रत्येक गॅलरीतल्या कुंडीत वाढवलेल्या रोपट्यांनी एकत्र फुलं शिंपडली तर? अशा नाना कल्पना सुचतात. लोक उंच इमारत, प्रासाद पाहून बांधकामाचं कौतुक करतात. मी त्...